नाशिक (प्रतिनिधी) :- न्यासाच्या कामकाजात अडथळा निर्माण करून विश्वस्त व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून कपालेश्वर मंदिराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मंडलेश्वर माधवराव काळे (वय 69, रा. कल्पनानगर, कॉलेज रोड, नाशिक) हे कपालेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित आरोपी अभिजित गाढे, अतुल शेवाळे, अविनाश गाढे, हेमंत ऊर्फ पप्पू गाडे, साहेबराव गाडे, चिन्मय गाढे, अनिल भगवान, आदेश भगवान, कपिल भगवान व आदिनाथ गाडे (सर्व रा. पंचवटी) यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून अनधिकृतपणे श्री कपालेश्वर महादेव मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील विश्वस्त व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व दमदाटी करून मंदिरातील दानपेटी सभामंडपाच्या बाहेर आणली.
हेही वाचा : नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर कांदे व टमाटे फेकले
ही दानपेटी मंदिरात लावायची नाही, असे बोलून न्यासाच्या कामकाजात अडथळा निर्माण केला, तसेच मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कॅमेऱ्याच्या कनेक्टिंग बॉक्समधील वायरिंगमध्ये छेडछाड करून नुकसान करून मंदिराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दि. 11 जुलै ते 27 सप्टेंबर 2023 या कालावधीत मंदिर परिसरात घडला.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागडे करीत आहेत.