वांद्रे-वरळी सी-लिंकवर विचित्र अपघात ; ३ जण  ठार, 'इतके' गंभीर जखमी
वांद्रे-वरळी सी-लिंकवर विचित्र अपघात ; ३ जण ठार, 'इतके' गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर मोठा अपघात झाला. वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली. चार गाड्यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.  

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद सरफराज शेख (वय ४३) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.
 
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या कारने सी लिंकवरील टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 9 जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सरफराज हा वांद्रे-वरळी सी लिंकवरून सुसाट गाडी चालवत होता.यादरम्यान त्याने एका मर्सिडिज कारला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढत गाडी दामटली. दरम्यान, आरोपीने वरळी सी लिंक टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला.

खातीजा सुलेमान हाटिया, हवागोरी हनीफ पीर आणि मोहम्मद हनीफ आदम पीर अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याशिवाय 9 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.अद्याप सर्व जखमींची नावं कळू शकलेली नाही. सर्व जखमींवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चौकशी सुरू आहे. 

या भीषण अपघातात आरोपी कारचालक सरफराज देखील जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला रुग्णालयातून डिचार्ज मिळताच अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group