नाशिक (प्रतिनिधी) :- तक्रारदाराने नोंदणी केलेला जनरल मुखत्यारपत्र नोंदणीचा दस्त त्यांना देण्याच्या मोबदल्यात पाचशे रुपयांची लाच मागणे मालेगावचे सह दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर जिभाऊ खांडेकर यांच्यासह तिघांना महागात पडले आहे.
याबाबत माहिती अशी, की तक्रारदार यांनी जनरल मुखत्यारपत्र नोंदणी केलेला दस्त त्यांना देण्याच्या मोबदल्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील एजंट दत्तू देवरे यांनी पंचांसमक्ष 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली, तसेच वरिष्ठ लिपिक तथा दुय्यम सहनिबंधक ज्ञानेश्वर जिभाऊ खांडेकर यांच्या सांगण्यावरून व त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे डाटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा सुरितराम शेलार (वय 36) यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन वरील तीनही आरोपींविरुद्ध मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे कलम 7 (अ),12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाणके, परशुराम पवार यांनी हा सापळा यशस्वी केला. याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे अभिनंदन केले.