पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.
मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सातत्याने धमकीचे फोन तसेच ई-मेल येत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी आरोपीने दिली.
आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने जे जे रुग्णालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या आरोपीने मी कुख्ख्यात गुंड दाऊड इब्राहिमचा माणूस असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा माग काढला.
त्यानंतर चुनाभट्टी परिसरातून एका २९ वर्षीय संशयित आरोपीला अटक केली. कामरान खान, असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याने ही धमकी नेमकी कोणत्या उद्देशाने दिली. याचा तपास आझाद मैदान पोलिस करीत आहेत.