भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे देण्यात आली आहे. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी खास डिनरचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. डिनरमध्ये नेत्यांसाठी खास महाराष्ट्रीयन मेन्यू ठेवण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात मध्ये उपस्थित राहतील. या नेत्यांच्या स्वागतासाठी पार्लेश्वर ढोल पथक तसेच मुलींच्या लेझीम पथकाने तयारी केली आहे.
उद्धव ठाकरेंकडून डिनरचं आयोजन
साडेसहा वाजता इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल. तर ८ वाजता उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. नाष्ट्यासाठी बाकरवडी, नारळाची वडी, फळांचा ज्यूस असणार आहे. याशिवाय दुपारच्या जेवणात झुणका-भाकर, काळ्या वाटाण्याची मिसळ, डाळिंबाची उसळ, मिरचीचा ठेचा आणि मसाले भात असणार आहे.
दरम्यान, या बैठकीआधी इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. कारण इंडिया आघाडीत सहभागी झालेल्या राजकीय पक्षांची संख्या आता २८ इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील डाव पीडब्लूपी आणि आणखी एक प्रादेशिक पक्ष इंडियामध्ये सामील झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
दरम्यान, दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत निवडणुकीची रणनीती, जागावाटपाचा फॉर्म्युला, लोगो आणि किमान समान कार्यक्रम यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. इंडिया आघाडीच्या निमंत्रक व समन्वय समितीच्या सदस्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली.