गुन्हे शाखेची कामगिरी, 1.72 लाखांचा नायलॉन मांजा जप्त
गुन्हे शाखेची कामगिरी, 1.72 लाखांचा नायलॉन मांजा जप्त
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजाबाबत घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे यंदा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत आली असून, गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने मुंबई नाका परिसरातील बजाज शोरूमजवळ धाड घालून तब्बल 1 लाख 72 हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 215 गट्टू जप्त केले आहेत. या कामगिरीमुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नायलॉन मांजा विक्रेत्यांचा तपास सुरू असताना रविवारी (दि. 7) गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अंमलदार नितिन जगताप व विलास चारोस्कर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की हरी विहार सोसायटीच्या गेट जवळील चहाच्या टपरीजवळ, बजाज शोरूमच्या मागे, मुंबई नाका येथे एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे,

ही माहिती कळताच त्यांनी वरिष्ठांना खबर दिली व वपोनि विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. चेतन श्रीवंत, पो. ना. मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर यांच्या पथकाने बजाज शोरूम परिसरात सापळा रचला असता अरबाज फिरोज शेख (वय 24, रा. भद्रकाली, जुने नाशिक) हा येताच त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एका प्लॅस्टीकच्या गोणीमध्ये व खाकी रंगाच्या बॉक्समध्ये असलेले 215 नग बंदी असलेला मोनो फाईटर, मोनो काईट, गो इंडिया गो कंपनीचे नायलॉन मांजा असे 1,72,000 रुपये किमतीचे 215 गट्टू हस्तगत केले.

त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने सदरचा मांजा हा अहमद हुसून जहीद काझी (रा. बांद्रा, मुंबई) याच्याकडून आणल्याचे सांगितले. या माहितीनुसार पोलिसांनी अरबाज फिरोज शेख (रा. भद्रकाली, जुने नाशिक) व अहमद हुसून जहीद काझी (रा. बांद्रा, मुंबई) यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 188, 290, 291 सह पर्यावरण (संरक्षण ) कायदा 1986 चे कलम 5, 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचा नॉयलॉन मांजा विक्रेता अहमद काझी याचा पोलीस शोध घेत आहेत.

अरबाजला तडीपार करणार
जुन्या नाशिकचा संशयित आरोपी अरबाज फिरोज शेख याच्याविरुद्ध यापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात नायलॉन मांजा विक्री केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या इसमावर तत्काळ नाशिक शहरातून हद्दपार करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी, तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. चेतन श्रीवंत, हवालदार रमेश कोळी, महेश साळुंके, देवीदास ठाकरे, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, चालक सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिरसाठ यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group