पंतप्रधान मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा
पंतप्रधान मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा
img
Dipali Ghadwaje
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. सकाळी 10.30 वाजता त्याचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. त्यानंतर नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला. यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन आणि गोदावरीची आरती करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. 

मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती
काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला. यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आली. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी पंतप्रधान मोदींना पूजा सांगितली. तसेच पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले. 
 
नाशिकला १३० पोलीस अधिकाऱ्यांसह दोन हजार अंमलदार व राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या (एसआरपीएफ), असा सुमारे अडीच हजार अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. विविध जिल्ह्यांमधून १३ बॉम्ब शोधक-नाशक पथकं दाखल झाले असून यावेळी बॉम्ब शोधक-नाशक पथकाने मोदींच्या काळाराम मंदिर परिसरात जाण्याआधी कसून तपासणी केली. अनेक पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याने काळाराम मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले.  

काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. 

 
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group