नाशिक (प्रतिनिधी) शिवसेनेचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी परिवारासह पवित्र रामकुंडावर गोदामाईची महाआरती केली.
श्री काळाराम मंदिरातील श्री प्रभू रामचंद्र यांच्या दर्शन, आरती व पूजनानंतर शिवसेनेचे कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी, पुत्र आदित्य, तेजस यांनी गोदाकाठी येऊन पवित्र रामकुंड येथे पूजा केली. त्यानंतर महाआरती करण्यात आली.
गोदातीरी रोज होत असलेल्या या आरतीच वेळ साधत ठाकरे कुटुंबीयांच्या हस्ते व शिवसेनेच्या पदाधिकारी शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा आरती सोहळा पार पडला.
पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, वैभव बेळे, क्षेमकल्याणी आदींनी गोदामाईच्या महाआरती पूर्वी ठाकरे कुटुंब यांच्या हातून संकल्प सोडला, त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी भव्य अशा दोन पंचारतीद्वारे आरती करण्यात आली, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
उपस्थित सर्व रामभक्त व शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांना मोबाईल मोबाईलच्या प्रकाशामध्ये महाआरती म्हणण्याचे आवाहन करण्यात आले, त्यामुळे यावेळी अतिशय धार्मिक व मोहक वातावरण तयार झाले होते.
उद्धव ठाकरे यांनी भगवा पोशाख व रुद्राक्षमाळ परिधान केल्याने गोदा काठावरील मंगल वातावरणात अधिकच भर पडल्याचे बोलले जात होते. गोदाकाठी रामकुंडावर खास चबुतरा उभा करण्यात आला होता तसेच फुलांच्या माळा, कमानी व विद्युत रोषणाईने परिसर झगमगून गेला होता.
यावेळी ढोल ताशांच्या गजराबरोबरच गंगा गोदावरी माता की जय, सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय, वंदे मातरम आधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
या महाआरतीप्रसंगी खा. अरविंद सावंत, खा. संजय राऊत, खा. विनायक राऊत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, विलास शिंदे, देवानंद बिरारी, प्रथमेश गीते आदी शहरातील आजी-माजी पदाधिकारी तसे संपूर्ण राज्यभरातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता.