मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती. अशातच मुंबई काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी असलेले वांद्रे पूर्व येथील आमदार झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचा हात सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सहभागी होणार आहे.
मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.