नाशिक: नाशिकलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखराकडे नेणारे महाराष्ट्राचे विकास पुरुष देवेंद्र फडणवीस हे नाशिक शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यासाठी नाशकात येत आहेत. त्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भाजप नाशिक महानगर शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.
नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले व नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यांचे लोकार्पण व अनेक कामांचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी 2.30 वाजता ओझर विमानतळावर आगमन होणार असून लगेचच दुपारी 2.45 वाजता नाशिक पूर्व मतदारसंघातील विविध कामांचे उद्घाटन नंतर मॅरेथॉन चौकात जलपरिषद रथाचे उद्घाटन, दुपारी 4 ते सायंकाळी 6 वा. या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील आयोजित क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 6 वाजेनंतर आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या सर्व सोयींनी युक्त अशा अत्याधुनिक सुविधा असलेल्या सातपूर पोलीस स्टेशनच उद्घाटन, सायंकाळी 6.30 वाजता आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेले नाशिकच्या वातानुकूलित व अत्याधुनिक मेळा बस स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. तरी मेळा बस स्थानकाच्या उद्घाटन साठी मोठे संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ही शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले आहे.
याचवेळी ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक मध्यच्या आमदार निधीतून साकार झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. दरम्यान शहरातील तिन्ही आमदार अनुक्रमे आ.राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, आ. सीमाहिरे यांच्या विधानसभा क्षेत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फलक लावून सजावट करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.