विद्युत रोहित्र चोरणाऱ्या संशयितास ग्रामस्थांच्या मदतीने पकडले
विद्युत रोहित्र चोरणाऱ्या संशयितास ग्रामस्थांच्या मदतीने पकडले
img
दैनिक भ्रमर

नाशिक : महावितरणच्या नाशिक मंडळातील त्र्यंबकेश्वर परिसरातील पहीने गावात १५ फेब्रुवारी रोजी सकाळी महावितरणच्या रोहित्राचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील संशयितास ग्रामस्थांच्या सतर्कतेने व मदतीने पकडण्यात आले असून वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयितास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेने व सहकार्याने सदर प्रकार उघडकीस आला असून अखंडित वीज पुरवण्यासाठी अशा प्रकारे जागरूक व सतर्क राहून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 


मागील ६ महिन्यात त्रंबकेश्वर परिसरातील महावितरणचे आठ विद्युत रोहित्र चोरीला गेले होते. विद्युत रोहित्र हे वीज पुरवठ्यातील महत्वाचे साधन असल्याने ते चोरीला गेल्यामुळे अखंडित वीज पुरवठा करण्यास महावितरणला अडथळा निर्माण होऊन यामुळे आर्थिक फटका सुद्धा बसला होता आणि ग्रामस्थांना सुद्धा अखंडितपणे वीज पुरवठा मिळण्यास अडथळा झाला होता. सदर चोरीबाबत संबंधित पोलिस स्टेशनमध्ये महावितरणकडून फिर्याद सुध्दा दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र असे प्रकार वारंवार घडत असल्याने महावितरण आणि पर्यायाने ग्रामस्थांना सुद्धा याचा त्रास होत होता. 


यासंदर्भात संबधित महावितरणच्या नाशिक ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून सर्वांच्या सहकार्याने चोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ संबंधीत कक्ष अभियंता किंवा जनमित्र यांना माहिती द्यावी आणि तात्काळ रोहित्रकेंद्राची स्थळ पाहणी करण्यास ग्राहकांना कळविण्यात आले.


त्यानुसार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी त्रंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील विद्युत रोहित्रावरील वीज पुरवठा बंद झाल्यावर स्थानिक नागरिकांनी तत्काळ जनमित्र व कक्ष अभियंता यांना कळविले आणि सोबतच रोहित्र केंद्राची पाहणी केली असता वीज रोहित्राचे साहित्य चोरणारी संशयित टोळी रोहित्राजवळ आढळून आली. त्यावेळी एक संशयितास ग्रामस्थांनी पकडले मात्र टोळीतील इतर दोन संशयित पसार झाले. त्याच्याकडे वीज रोहित्र व तार तोडण्याचे व चोरून नेण्याचे साहित्य यावेळी आढळून आले.  


सदर घटनेची तात्काळ वाडीवर्हे पोलीस यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी येऊन तात्काळ संशयितास अटक केली. त्रंबकेश्वर शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता महेश जगताप यांच्या तक्रारीवरून वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये संशयित शिवाजी बंडू बोडके याचे विरुद्ध कलम भादंवि ३७९ व ५११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखंडित वीज पुरवण्यासाठी महावितरणच्या विद्युत यंत्रणेतील साहित्य चोरी करताना वा नेताना आढळ्यास अशा प्रकारे जागरूक व सतर्क राहून ग्राहकांनी कळविण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group