
१९ मार्च २०२४
नाशिकरोड (प्रतिनिधी) :- राज्यात एमडी (मेफेड्रीन) मादक द्रव्य प्रकरण गाजत असतानाच नाशिकरोडला पुन्हा एकदा 58 हजार 170 रुपये किमतीचे सुमारे 20 ग्रॅम मेफेड्रीन गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने जप्त केले आहे. या प्रकरणी किरण चंदू चव्हाण (वय 23, रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ अधिकार्यांनी सर्व प्रकारच्या गुन्हेगारीच्या तपासाचे आदेश दिले आहेत. त्याअंतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विशाल कुंवर व समाधान वाजे यांना अश्विनी कॉलनी परिसरात राहणारा एक इसम एम. डी. विक्रीसाठी गिर्हाईकाच्या शोधात येणार आहे, अशी बातमी समजली.
हे वृत्त त्यांनी वरिष्ठांना सांगताच गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी कॉलनी परिसरात सापळा रचला असता किरण चव्हाण हा एमडी विक्रेता त्यांच्या सापळ्यात अडकला. त्यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक विवेक पाठक, हवालदार मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, समाधान वाजे, विशाल कुंवर, महेश खांडबहाले, तेजस मते, हवालदार संजय सानप, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, मधुकर साबळे, अतुल पाटील, संजय पोटिंदे, जितेंद्र वजिरे, रोहित अहिरे, रासायनिक सहाय्यक विश्लेषक प्रवीण मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
याबद्दल त्यांचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे व वरिष्ठांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.
Copyright ©2025 Bhramar