२१ मार्च २०२४
नाशिक (प्रतिनिधी) :- लग्नाचा बनाव करून नवरीसह चार जणांनी एका इसमास साडेअकरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रफुल्ल शांताराम भिडे (वय 45, रा. गायत्रीनगर, हिरावाडी, पंचवटी) हे लग्न करण्यासाठी वधूच्या शोधात होते. त्यादरम्यान आरोपी आकाश पावरा (रा. नवागाव पिंपरी, ता. शहादा, जि. नंदुरबार), दीपक पटेल, राहुल पटेल व पूजा पटेल (सर्व रा. करण चौफुली, तोरणमाळ, ता. अक्राणी, जि. नंदुरबार) यांनी संगनमत करून फिर्यादी भिडे यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर आरोपींनी भिडे यांना नंदुरबार जिल्ह्यातील करण चौफुली येथे बोलावले. तेथे त्यांना लग्न जमवून देण्याचा व मुलगी शोधून देण्याचा बनाव रचला. त्यानंतर फिर्यादी भिडे यांचा आरोपींवर विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी भिडे यांना लग्नासाठी मुलगी दाखविली. त्यामुळे भिडे यांनी मुलगी पसंत करून लग्नास होकार दिला.
त्यानंतर आरोपी दीपक पटेल, राहुल पटेल व पूजा पटेल यांनी फिर्यादी भिडे यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपये घेतले. त्यानंतर पूजा पटेल हिच्यासोबत फिर्यादी भिडे यांचे लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर पूजा पटेल ही फिर्यादी भिडे यांच्या पंचवटी येथील हिरावाडीतील घरी सासरी नांदायला आली. त्यादरम्यान पूजा पटेलने दि. 8 ते 10 मार्च या कालावधीत फिर्यादी यांच्याकडून 50 हजार रुपये रोख घेऊन ते नंदुरबार येथे राहुल पटेल व दीपक पटेल यांना दिले.
त्यानंतर पुन्हा फिर्यादी भिडे यांनी दि. 11 मार्च रोजी राहुल पटेल यास 50 हजार रुपये दिले, तसेच 30 हजार रुपये दिल्यानंतर 1 लाख रुपये किमतीचे 5 तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दोन हार, 5 ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, सात तोळे वजनाचे एक ब्रेसलेट, कानातील सोन्याचे जोड, 1 ते 5 ग्रॅम वजनाचे कानातील कुडके, सोन्याचे मंगळसूत्र, तसेच 20 मार्च रोजी 20 हजार रुपये रोख, 10 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण 11 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज घेऊन ही नवरी पसार झाली.
त्यानंतर भिडे यांनी पत्नी माहेरी गेल्याचे समजून घरातील वस्तू पाहिल्या असता त्यात सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व मोबाईल नव्या नवरीने चोरून नेऊन फसवणूक केल्याची खात्री पटली.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नव्या नवरीसह लग्न जमवून देणार्या चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वनवे करीत आहेत.
Copyright ©2025 Bhramar