ठाणे/नाशिक – अचानक मानेला गाठ झाली. डॉक्टरांनी कॅन्सरचं निदान केलं. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. कुटुंबाने बळ दिलं. तो झुंजला आणि जिंकला. ही कहाणी आहे कॅप्टन अक्षय आर्ते या तरुणाची. विमानाचे पायलट असलेल्या अक्षय यांनी आता राज्यभरातील तरुणांना ड्रोनचे धडे देण्याचा चंग बांधला आहे.
कॅप्टन अक्षय निलेश आर्ते यांचा जन्म ठाण्यातला. सिव्हिल इंजिनीअर असलेल्या वडिलांचा फेब्रीकेशनचा व्यवसाय तर कर्तव्यदक्ष आईची आईस्क्रीम फॅक्टरी. घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे अक्षय यांनी नाशिकच्या ओझर येथील एचएएल प्रवरा एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरींगमध्ये प्रवेश घेतला. पदवी घेतल्यानंतर नोएडा आणि अमेरिकेत पुढील शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यामुळे आकाश मोकळे झाले होते.
त्याचवेळी गो एअर कंपनीने ऑफर दिली. तिथे कार्यरत असतानाच एक वाईट दिवस उजाडला. आपल्या मानेजवळ काही तरी फुगल्यासारखे आहे, असे अक्षय यांना दिसले. त्यांनी दुर्लक्ष केले. पण, काही दिवसांनी तो फुगवठा चक्क गाठीमध्ये बदलला होता. त्यामुळे तातडीने डॉक्टरांना दाखविण्यात आले. डॉक्टरांनी कॅन्सरचे निदान केले. हे ऐकून अक्षय यांच्यासह संपूर्ण कुटुंबियच हादरुन गेले.
डॉक्टरांसह कुटुंबातील सदस्यांनी अक्षय यांना धीर दिला. त्यामुळेच कॅन्सर विरोधात लढा देण्याचा निश्चय झाला. तिसऱ्याच दिवशी केमोथेरपीला सुरुवात करण्यात आली. असह्य त्रास सहन करीत अक्षय यांनी अखेर कॅन्सरवर विजय मिळविला. कोण आपल्या बरोबर असते किंवा नाही हे सुद्धा अक्षय यांना या काळात समजले. पत्नी, आई-वडिल, सासू-सासरे, बहिण, मेव्हणी अशा घरच्या सदस्यांनी दिलेला धीर कामी आला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरचा धोका नाहिसा झाला.
जीवलग मित्राची साद
कॅन्सरच्या आजारपणामुळे अक्षय यांचे जीवनच बदलून गेले. त्यांना विमानाचे सारथ्य पुन्हा करायचे होते. पण, ते शक्य होत नव्हते. हे स्वप्न अधुरेच राहणार, असे अक्षय यांना मनोमन वाटू लागले. त्याचवेळी नाशिक येथील मित्र डॉ. राहुल बोराडे यांनी अक्षय यांची भेट घेतली.
विमानाचे नाही तर ग्राऊंड पायलट तर बनणे शक्य आहे, असा विश्वास दिला. अखेर अक्षय आणि राहुल यांनी ड्रोन कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे. आता याच कंपनीबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. याद्वारे राज्यभरातील तरुणांना ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आपल्या समोर कितीही कठीण प्रसंग आला तरी डगमगून जाऊ नये. परिवार आणि मित्र आपल्यासोबत असेल तर तीच आपली ताकद असते. कुठलीही लढाई आपण जिंकू शकतो. - कॅप्टन अक्षय आर्ते