देशासह राज्यात सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली असून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीमध्ये कोणाला लोकसभेचे तिकीट मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे , नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यानंतर आज शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीमध्ये सातारा, रावेर, बीड, माढा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून यापैकी किती जागांवरील उमेदवार आज जाहीर होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शरद पवार गटाकडे माढा आणि सातारा मतदार संघ आहेत. यापैकी माढ्यामध्ये नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. माढ्यातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती, मात्र ऐनवेळी महादेव जानकरांनी महायुतीची वाट धरली. त्याचसोबत रणजित निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटीलांच्याही नावाची चर्चा आहे.
तसेच साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता उदयनराजेंविरोधात नवा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साताऱ्यातून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील तसेच काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.