पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले संविधानाच्या नावावर .....
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले संविधानाच्या नावावर .....
img
Dipali Ghadwaje
भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलेल, अशी भीती सातत्याने काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. यालाच आज प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितलं आहे की, ''खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत. सरकारसाठी गीता, रामायण, महाभारत, कुराण, बायबल हे आपले संविधान आहे.'' राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.

राजस्थानमधील बारमेर येथे प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''एससी-एसटी, ओबीसी बंधू-भगिनींसोबत अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस जुने रेकॉर्ड चालवत आहे. निवडणुका आल्या की संविधानाच्या नावावर खोटे बोलणे ही इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे.'' 
 
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''बाबासाहेब हयात असताना काँग्रेसने त्यांना निवडणूक जिंकू दिली नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न मिळू दिला नाही. त्यांनी देशात आणीबाणी लादून संविधान संपवण्याचा प्रयत्न केला, तेच आज मोदींना शिव्या देण्यासाठी संविधानाच्या नावाखाली खोटेपणाचे पांघरूण घालत आहे.''

ते म्हणाले की, ''मोदींनी देशात पहिल्यांदा संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या लोकांनी तर संविधान दिन साजरा करण्यास विरोध केला. हा बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान आहे की नाही? मोदींनी बाबासाहेबांशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केला. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या अपप्रचारापासून सावध राहण्याची गरज आहे.''


दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''या इंडिया आघाडीच्या लोकांमध्ये भारताविरुद्ध किती द्वेष आहे, हे त्यांच्या जाहीरनाम्यातही दिसून येते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर फाळणीची दोषी असलेल्या मुस्लिम लीगची छाप आहे. आता इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या आणखी एका गटाने देशाविरोधात अत्यंत धोकादायक घोषणा केली आहे. भारताची अण्वस्त्रे आम्ही नष्ट करू, असे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात लिहिले आहे.''

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group