नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना शिंदे गटास मिळणार असा विश्वास राज्याचे शिक्षण मंत्री आणि या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे याबाबतची घोषणा उद्या गुरुवारी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आले होते त्यानंतर त्यांनी नाशिक मधील प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्या ठिकाणी विधिवत पूजाअर्चा केली . यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी सांगितले की नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा सुटलेला आहे. खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की सगळे वाद संपले आहेत नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळणार आहे हे निश्चित झाले असून उमेदवार देखील हेमंत गोडसे असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सर्व प्रश्नांवर झालेला जो वाद आहे त्यावर केसरकर म्हणाले की, तीन वेगवेगळे गट एकत्र आलेले आहेत त्यामुळे थोड्या अडचणी आल्या आहेत पण या अडचणी म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळच आहे त्यामुळे हे वादळ संपले असून प्रश्न देखील मार्गी लागला आहे याबाबतची अधिकृत घोषणा ही गुरुवारी होणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.