नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून कोण लढणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे.
नाशिकची जागा लढवण्यासंदर्भात छगन भुजबळ यांना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी सांगितले. त्यानंतर भुजबळांनी तयारी सुरु केली होती. परंतु पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधून भुजबळ यांनी लढावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश असल्याचे सांगितल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यानंतर छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय आज पत्रकार परिषद जाहीर केला. या जागेवर तिढा निर्माण झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ म्हणाले की, अमित शाह यांनी नाशिकची जागा लढवण्याचे मला सांगितले. त्यावेळी ही जागा शिवसेनेकडे असल्याचे आम्ही सांगितले. त्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलू. त्यानंतर मी काम सुरु केले.
नाशिकमध्ये येऊन विविध घटकांशी चर्चा सुरु केली. मराठा समाज, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक विविध घटकांनी मला पाठिंबा दिला. परंतु यानंतर तीन आठवडे झाले आहेत. आता महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन त्यांनी प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केला आहे. परंतु महायुतीचा नाशिकचा प्रश्न सुटला नाही. यामुळे मी माघार घेत आहे.
नाशिकच्या जागेसाठी अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचे नाव सुचवले होते. परंतु भाजप नेतृत्वाने मलाच निवडणूक लढवण्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा निरोप आहे, तुम्हाला लढवावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितल्याचे छगन भुजबळ म्हणाले. आता मी माघार घेत आहे.
भुजबळांनी ही भूमिका घेतल्यामुळे आता महायुतीकडून हेमंत गोडसे यांनाच तिकीट मिळण्याची दाट शक्यता असून वाजे विरुद्ध गोडसे अशी दुरंगी लढत नाशिकमधून पाहायला मिळण्याची शक्यता आहे.