काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या भोगाव जिल्ह्यातील मैनपुरी परिसरात शनिवारी (ता. २०) पहाटेच्या सुमारास घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरसह ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या घटनेत ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर २४ जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठा आक्रोश केला.
नेमकं काय घडलं?
मृत व्यक्ती कन्नौजच्या छिब्रामौ पोलीस स्टेशन हद्दीतील कुंवरपूर गावातील रहिवासी असून ते शुक्रवारी नामकरण सोहळ्यासाठी बेलधारा गावात गेले होते.
शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सर्वजण ट्रॅक्टर-ट्रॉलीने घरी परतत होते. भोगाव परिसरातील द्वारकापूर येथे ट्रॅक्टर आले असता, समोरील लाईट अचानक बंद पडली. त्यावेळी चालकाने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा करून लाईट दुरुस्त करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी पाठीमागून अचानक एक भरधाव ट्रक आला. या ट्रकने ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॉलीत बसलेल्या ४ महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर २४ जण जखमी झाले. सर्व मृत व जखमी हे कुंवरपूर छिब्रामाळ गावचे रहिवासी आहेत.