भव्य शक्ती प्रदर्शन करीत राजाभाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
भव्य शक्ती प्रदर्शन करीत राजाभाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : एकच राजे, राजाभाऊ वाजे...., बच्चा बच्चा केहता है, राजाभाऊ वाजे सच्चा है..., नाशिक का खासदार कैसा हो, राजाभाऊ वाजे जैसा हो.. शिवसेना जिंदाबाद... महाविकास आघाडीचा विजय असो... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या समवेत शोभायात्रेद्वारे भव्य शक्तिप्रदर्शन करीत शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय येथून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. महाकवी कालिदास मंदिरासमोरील बी. डी. भालेकर मैदान तसेच पक्ष कार्यालय येथे एकत्र जमताच प्रचंड घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे मिरवणूक रथावर विराजमान झाले. 

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार योगेश घोलप, शिवसेनेच्या नेत्या माजी आमदार निर्मला गावित, काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल, आमदार किशोर दराडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, राहुल दिवे, प्रशांत दिवे आदी मान्यवर सजविलेल्या उघड्या टेम्पोवर विराजमान झाले होते.

यावेळी शालिमार चौक,० शिवाजी रोड, मेन रोड, रविवार कारंजा, टिळक पथ, महात्मा गांधी रोड, मेहेर चौक या शहरातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशाच्या गजरात घोषणा देत जय जय कार करीत शोभायात्रेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर या आघाडीच्या किंवा पाच नेत्यांसमवेत पक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षात जाऊन राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे आदींनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. 

यावेळी त्यांच्यासमवेत असंख्य चाहते व पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी नेते गण मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सीबीएस ते मेहर चौकातील भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या गर्दीमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group