नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : महायुतीच्या दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप शिवसेना यांचे विविध घटक तथा मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खास नाशकात आले होते.
महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता टोमणे मारणे, टीका करणे, विरोधकांना शेरेबाजी करणे यापलीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतेही काम नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सहकारी पक्षांसह अन्य इच्छुक उमेदवारही एक दिलाने उमेदवाराच्या प्रचारात काम करतील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, खा. हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक मतदारसंघातील उमेदवारी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या विषयावरील सर्व वादावर पडदा पडलेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सहकारी पक्षांसह अन्य इच्छुक उमेदवारही एक दिलाने उमेदवाराच्या प्रचारात काम करतील.
सर्व घटक एकत्र आलेले दिसतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे उमेदवार गोडसे यांची रॅली शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाजवळ आली असता मशाल पेटवून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टिकास्त्र सोडले, मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्याकडे आता कुठलीही काम उरलेले नाही. राज्यातील सत्ता गेली आहे. नवे सरकार गेली दोन वर्ष हे सरकार काम करीत आहे. ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे अद्यापही त्यांना सत्तेची स्वप्न पडतात. तसेच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही निवडणूक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंना अजिबातच काम उरणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी जे उमेदवार उभे केले आहेत, ते एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार आहेत. त्यामुळे विरोधकांचा पराभूत निश्चितच होणार आहे. राज्य सरकार जे काम करीत आहे, त्या आधारे या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, असे विधान देखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणायचे आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जनता त्यांच्यावर समाधानी आहे.