पंचवटीतील दत्तनगर मध्ये समाजकंटकांनी पाच दुचाकींसह रिक्षाची केली तोडफोड
पंचवटीतील दत्तनगर मध्ये समाजकंटकांनी पाच दुचाकींसह रिक्षाची केली तोडफोड
img
Mukund Baviskar
नाशिक (मुकुंद बाविस्कर) :- पेठरोडवरील दत्तनगर परिसरातील कॅनॉलच्या पलीकडे असलेल्या हरिओम्‌‍नगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उत्तमराव उगले यांच्या उगले सदनच्या आवारात उभ्या असलेल्या पाच मोटारसायकलींसह एका रिक्षाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करीत मोठे नुकसान केले. 

आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती उत्तमराव उगले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, की पंचवटीमधील पेठ रोड भागात कॅनॉलच्या पलीकडे दत्तनगरलगतच हरिओम्‌‍नगर असून, या ठिकाणी माजी नगरसेवक उत्तमराव उगले राहतात. त्यांच्या निवासस्थानाच्या जवळच काही भाडेकरू राहत असून, ते सर्व जण व्यवसाय व नोकरीनिमित्त कामावर जातात. रात्रीच्या सुमारास घराच्या आवारात भाडेकरूंची एक रिक्षा व चार मोटारसायकली उभ्या होत्या, तसेच उत्तमराव उगले यांची शाईन कंपनीची एमएच 15 जीई 5220 या क्रमांकाची मोटारसायकल उभी होती.

काल लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त उत्तमराव उगले हे दिवसभर बाहेर व्यस्त होते. रात्री घरी परत आल्यानंतर सर्व जण झोपी गेलेले होते; मात्र पहाटेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून पेठ रोड मार्गे सात-आठ समाजकंटक हातात दांडके घेऊन आले. वाहनातून उतरून त्यांनी रात्रीच्या अंधारात उगले सदनाच्या आवारात उभ्या असलेल्या मनोज चंदनशिव, सागर चंदनशिव आणि मोरे यांच्या चार मोटारसायकलींची, तसेच रिक्षांची तोडफोड केली, तसेच जाताना शिवीगाळ करून पुन्हा वाहनातून उतरत उगले यांच्या दारासमोरच उभ्या असलेल्या त्यांच्या शाईन मोटारसायकलीचीही तोडफोड केली.

त्याच वेळी नजीकच्या घरातून एक वृद्ध महिला व त्यांचा मुलगा जागा झाला. त्यांनी समाजकंटक आल्याने आरडाओरडा केला; मात्र त्याच वेळी अंधाराचा फायदा घेत ते सर्व समाजकंटक शिवीगाळ करीत वाहनात बसून पुढील मार्गाने फरारी झाले. त्यानंतर सकाळी ही घटना कळल्यावर उत्तमराव उगले यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात उगले यांनी सांगितले, की नजीकच्या झोपडपट्टीतील काही समाजकंटकांच्या टोळक्याने या वाहनांची तोडफोड केल्याचा संशय असून, त्याला सध्याच्या राजकीय वातावरणाचा तथा निवडणुकीचा रंग देण्याचा डाव यातून दिसून येतो. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे. या घटनेत नुकसान झालेल्या मोटारसायकली व रिक्षाचे मालक हे गोरगरीब घरांतील असून, पोटापाण्यासाठी ते छोटे छोटे व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे, असे उगले यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group