नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- गल्ली पासून दिल्ली पर्यंतचे राजकारण हे सध्या गढूळ झालेले असतांना नाशिकमधून मात्र आदर्शचा परिपाठ निर्माण झाला आहे.
नफरत की दुनिया मे मोहब्बत की दुकान हमेशा आबाद रहती है हा आदर्श घालून दिला. नाशिक रोड येथे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवार समर्थकांमध्ये हाणामाऱ्या होत असतानाच येथे लोकसभेचे विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे व पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांनी गळाभेट घेत परिपक्वतेचे राजकारण करत सध्याच्या राजकारण्यांसमोर आदर्श निर्माण केला.
विरोध हा निवडणुकीपुरता असतो तर मैत्री, प्रेमाचे संबंध आयुष्य भर टिकतात असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक चुरशीच्या वातावरणात पार पडली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे व शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यात जोरदार लढत झाली. या निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप, टीका झाली.
त्यामुळे मतदान करताना काही ठिकाणी या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामाऱ्या, वाद झाले. काही ठिकाणी समोरासमोर घोषणा बाजी, तर काही ठिकाणी बॅनर तोडफोड झाली. या निवडणुकीत वाजेंनी बाजी मारत विजय मिळवला. तर विजयाची हॅट्रिक करू पाहणारे हेमंत गोडसे हे दीड लाख मतांनी पराभूत झाले. वाजेंच्या शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. तर शिंदे गटच्या नेत्यांनी अनेक आरोप केले.
हे शांत होत असतानाच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राजाभाऊ वाजे व हेमंत गोडसे समोरासमोर आले. काही दिवसापूर्वी आरोप, टीका करणाऱ्या या दोघांनी सर्व विसरून जुन्या मैत्रीला उजाळा देत गळाभेट घेतली. गोडसे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत वाजेेंचे अभिनंदन केले. पालकमंत्री दादा भुसे व शिंदे गटाचे सहसपर्क प्रमुख राजू लवटे यांनीही सहभाग घेत विनोद केले. त्यावर दोघांनीही खळखळून हसून त्याला दाद दिली.
या छोट्याशा घटनेतून कार्यकर्त्यांनाच नव्हे तर देशवासियांना "नफरत कि दुनिया मे मोहब्बत की दुकान आबाद राखनी चाहिये " हा मोलाचा संदेश दिला. त्याची सध्या जोरदार चर्चा होत असून समाजाकडूनही स्वागत होत आहे. सोशल मिडियातील नेटक-यांनीही याची दखल घेतली आहे. हा मेसेज व्हायरल होत आहे.