मुंबईत मॉन्सूनचे आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, या पावसामुळे मुंबईत विक्रोळी येथे रविवारी रात्री दुर्दैवी घटना घडली आहे. व्रिकोळी परिसरातील एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून सुरक्षारक्षक व त्याच्या १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यातील लहान मुलगा हा त्याच्या वडिलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेला होता. मात्र, पाऊस सुरू असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला थांबून घेतले. मात्र, इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचाही मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मृत वडील हे ३८ वर्षांचे आहेत तर त्यांचा मुलगा हा १० वर्षांचा आहे. त्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. या दुर्घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कैलास बिझनेस पार्क, टाटा पॉवर हाऊसजवळ, पार्क साइट, विक्रोळी पश्चिम येथे ही घटना घडली.
दरम्यान, काल रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसात विक्रोळी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असतांना तेथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असतांना आपल्या वडिलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी १० वर्षांचा मुलगा गेला होता. यावेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने वडिलांनी मुलाला थांबून घेतले. याच वेळी अचानक बांधकाम सुरू असलेल्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या घटनेत स्लॅबच्या ढीगाऱ्या खाली दाबून बाप-लेकाच्या मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच इतर मजुरांनी दोघांना बाहेर काढून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या इमारतीचे काम नवे असतांना स्लॅब कसा कोसळला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार का? या कडे सर्वांचे लागले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळणार का ? या कडे देखील लक्ष लागले आहे.