नाशिक : हिंदू संस्कृतीला संपविण्याची भाषा करणाऱ्या लोकांसमोर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे कसे येतात? असा प्रश्न उपस्थित करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपा व मित्र पक्ष 45 पेक्षा अधिक जागा जिंकतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविजय अभियान हे यशस्वी होणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महा विजय 2024 अभियानासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक दौऱ्यासाठी रविवारी रात्री नाशिक मध्ये आले. यावेळी बावनकुळे यांचे स्वागत भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, पवन भगूरकर, महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी विजय साने, गोविंद बोरसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, निवृत्ती जोशी चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी महापौर सतीश कुलकर्णी, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.
सोमवारी सकाळी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शरद पवार आणि उद्योजक अदानी यांचे घरगुती संबंध आहेत त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत संबंधांमुळे ते एकमेकाबरोबर असतात त्यामध्ये राजकारणाच्या दृष्टिकोनातून इंडिया आघाडीने बघणे हे चुकीचे असल्याचे सांगून पाहून ते पुढे म्हणाले की,अदानी यांनी आत्तापर्यंत तीन वेळा हिंदू धर्माबाबत विधान केले आहे, मग उद्धव ठाकरे यांनी ठामपणे अदानी यांचे विधान मान्य आहे, असे सांगावे. मान्य नसेल तर इंडिया आघाडी सोडावी, अशी मागणी करून ते पुढे म्हणाले की जर हिंदू धर्माच्या तोडण्याची भाषा कोणी करत असेल तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कसे मान्य होते, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कारण ते हिंदू धर्माचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाविजय २०२४ म्हणजे काय यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यात भाजपाचे 45 पेक्षा अधिक म्हणजेच 45 प्लस ही भूमिका आहे या भूमिकेच्या दृष्टिकोनातून पक्षाचे कामकाज सुरू झाले आहे. या महाविजय 2024 साठी मी नाशिकमध्ये आलो असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की कोणती जागा कोणाला द्यायची आहे. यावर पार्लमेंटरी बोर्डामध्ये निर्णय होणार आहे. त्यामुळे आत्ताच त्यावर चर्चा करण्यात काहीच उपयोग नाही असे स्पष्ट करून महायुतीतील 11 घटक पक्ष हे एका ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. जी जागा ज्या पक्षाला मिळेल त्यांना ताकद देऊन आम्ही एकत्रित निवडणुका लढवू आणि विजय संपादन करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवार यांच्या प्रश्नावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की श्रीकांत शिंदे हे प्रभावी खासदार आहेत त्यामुळे ते निवडून येतील यात कुठलीही शंका नाही. काही मतदारसंघांमध्ये आजच एकतर्फी निवडणूकीचे चित्र आहे. आमच्या उमेदवारांसमोर विरोधी पक्षाचा उमेदवारच नाही, आज हेच आमचे मोठे बळ असल्याचे स्पष्ट करून रोहित पवार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत, आमच्या चार टर्म पूर्ण झाल्या आहेत, आम्ही हे आत्मविश्वासाने सांगू शकतो, असेही ते म्हणाले.
नागपूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जो व्हिडिओ शेअर झाला आहे, तो अतिशय विपर्यास आहे. जनतेमध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल खूप आदर आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये नागपूर किती बदलले आणि कसे बदलले हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांनी नागपूरचा एक रुपयाचा विकास केला नाही, ते असे आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकांच्या घरी, गेले त्यांच्या घराची पाहणी केली त्यांच्याशी हितगुज केलं त्यामुळे काहींच्या पोटात गोळा आला आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी देवळाली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तनुजा घोलप यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले आणि या ठिकाणी काही मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या त्यानंतर त्यानी त्र्यंबक दौरा करून येताना त्यांनी सातपूर येथे नागरिकांशी संवाद साधला, दुपारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसाद मंगल कार्यालय येथे तीनशे विधानसभा मतदारसंघातील वॉरियर्स ची बैठक घेतली . त्यांना संबोधित केले येथे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.