महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते दोन्ही नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसांचे बॅनर्स लागले आहेत. अशातच नाशिक शहरात लागलेल्या बॅनर्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय. अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आलाय.
विशेष बाब म्हणजे, संपूर्ण शहरात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे. यावरुन महायुतीत पुन्हा वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सामील झालेले अजितदादा लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. अजित पवार हे महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत.
आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं अनेकांचं म्हणणे आहे. अजित पवार यांची प्रशासकीय यंत्रणेवर चांगलीच पकड असल्याने ते राज्याच्या कारभार व्यवस्थित सांभाळून शकतात, असा अनेकांचा सूर आहे.
अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण नाशिक शहरात त्यांचे बॅनर्स लागले आहेत. या बॅनर्सवर छापण्यात आलेल्या भावी मुख्यमंत्र्यांच्या उल्लेखामुळे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे.