राज्यात सर्वत्र मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहे. राज्यातील विविध महामार्गांवर आंदोलन करण्यात येत आहे. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. काही अज्ञात व्यक्तींच्या वतीनं हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आकाशवाणी आमदार निवास इथे उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे. मंत्रालयातही येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केल्यानंतरच त्यांना आत सोडलं जात आहे. तसेच, हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत, त्या मरिन लाईन्स पोलीस स्थानकात नेण्यात आल्या आहेत.
गाडीच्या तोडफोड प्रकरणी बोलताना हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की, मी सुरक्षित आहे. ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली, त्या तरुणांना सोडून द्यावं. त्यांना कोणतीही शिक्षा करू नये, अशी माझी विनंती आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत. मंत्र्यांची घरं जाळणं हे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
काय घडलं नेमकं?
काही वेळापूर्वीच ही घटना घडली. साधारणतः सात, साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. तिथेच हसन मुश्रीफ यांची गाडी उभी होती. त्या गाडीवर दोन मराठा आंदोलकांनी हल्ला केला. त्यांनी गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. गाडीची पूर्ण तोडफोड करण्यात आली. गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. चौकशीनंतर ही गाडी मंत्री हसन मुश्रीफ यांची असल्याची माहिती मिळाली. काही मराठा आंदोलकांनी मंत्री मुश्रीफ यांची गाडी हेरुन गाडीवर हल्ला केला. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी तात्काळ आक्रमक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबईत मंत्रालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. मंत्रालयाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटच्याच बाजूला आमदार निवास आहे. या आमदार निवासच्या खाली मंत्री हसन मुश्रीफांची गाडी उभी होती. आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे. तसेच, हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.