नाशिक :- शहरातील व्यावसायिकांच्या सव्वा कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेश कारडा यांनी 1 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार राहुल लुणावत व सतीश कोठारी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी नरेश कारडा यांना त्याच दिवशी रात्री अटक केली होती.
त्यांना न्यायालयात हजर केले असता आज दि. 3 पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांनी कोठडीत वाढ करून 5 नोव्हेंबर पर्यंत त्यांचा मुक्काम कोठडीत राहणार आहे.
नरेश कारडा यांचे बंधू व या गुन्ह्यातील एक संशयित असलेले मनोहर कारडा यांनी काल आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
तक्रारीच्या संख्येत वाढ
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दिवसेंदिवस तक्रारदारांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे फसवणुकीच्या एकूण रकमेतही मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज एकूण 2 तक्रारी आर्थिक गुन्हे शाखे कडे आल्या असून आजपर्यंत एकूण 35 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
कारडा यांच्याकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.