नरेश कारडा यांच्या विरुद्ध चार कोटीच्या फसवणूक प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नरेश कारडा यांच्या विरुद्ध चार कोटीच्या फसवणूक प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):- आर्थिक फसवणूक प्रकरणी पोलिसांच्या कोठडीत असलेले कारडा कन्स्ट्रशनचे मुख्य संचालक नरेश कारडा यांच्यावर उपनगर पोलिस ठाण्यात चार कोटीचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कारडा यांच्या वरील आर्थिक संकट वाढले असून तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

याबाबत जळगाव येथील देवकर निवास, बळीराम पेठ येथील रहिवसी सुनील श्रीनाथ देवकर यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारी मध्ये म्हटले आहे की, माझे आजोबा गजानन दामोदर देवकर (वय ९०) हे माझे काका विनोदचंद्र गजानन देवकर यांच्याकडे मुंबईत राहतात. आमचा देवकर एक्सपोर्ट हा व्यवसाय आहे. आजोबा वृध्द असल्याने त्यांचे व्यवहार आणि कायदेशीर कामे पाहण्याचा अधिकार त्यांनी २७ एप्रिल २३ च्या जनरल मुखत्यार पत्राव्दारे मला दिला आहे.

आजोबांचे नाशिकमधील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्याशी २००७ पासून व्यावसायिक संबंध आहेत. आजोबांनी मला दिलेल्या माहितीनुसार १४ जून २०१७ रोजी कारडा यांच्या मालकीच्या जेलरोड येथील मौजे पंचक शिवारातील व महापालिका हद्दीतील स. न.७०/१ ब २ व ३ पैकी अंतिमरित्या अभिन्यासातील बिनशेती फ्लॉट मिळकत (नं. ०३ क्षेत्र ४१२८ चौ.मी) या व्यवहारासाठी आजोबा व नरेश कारडा यांच्यात व्यवहार झालेला आहे.

ही जागा आजोबा व त्यांचे लासलगाव येथील शालक मुकुंद शंकरराव भाटे यांनी पाहिलेली होती. त्यांच्यात चार कोटी रुपयांचा व्यवहार ठरलेला होता. त्याप्रमाणे आजोबांनी नरेश कारडा यांना एकदा दीड कोटी, दोन वेळा एक कोटी आणि एकदा पन्नास लाख रुपये चेकव्दारे दिले. आजोबा आणि कारडा यांचे व्यावसायिक संबंध जुने असल्याने वर उल्लेख केलेली मिळकत खरेदीखत करून देण्यास कारडा यांनी वेळ मागितला. आजोबांनी वेळ दिला.

ही मिळकत कारडा यांच्या कब्जात असल्याचे ते आजोबांना सांगत होते. त्यानंतर आजोबांना माहिती समजली की, ही मिळकत कारडा यांनी नाशिकमधील सहदुय्यम निबंधक येथे १६ एप्रिल २०१९ रोजी राहुल कन्हैयालाल कलानी (२८, मनोहर गार्डन, जयभवानीरोड, नाशिकरोड) यांना विक्री केली आहे. कारडा यांनी आजोबांची फसवणूक केली. आजोबांनी कारडांकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतली आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करू नका, अशी विनवणी केली.

आजोबांनी वेळ देऊनही कारडा यांनी रक्कम परत केलेली नाही. आजोबांनी मिळकतीचा व्यवहार रद्द झाल्याबाबतचा दस्त पोस्टाने कारडा यांना पाठविला होता. कारडा यांनी आजपर्यंत चार कोटी रुपये अथवा त्याच्या बदल्यात दुसरी मिळकत दिलेली नाही. या प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड तपास करत आहेत.

चार दिवसा पूर्वी मुबंई नाका येथे दाखल गुन्ह्यात संशयित अटक असलेले नरेश करडा यांचे बंधू मनोहर करडा यांनी रेल्वे समोर येत आत्महत्या केली होती.त्यामुळे खळबळ उडाली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group