नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी (29 फेब्रुवारी) रात्री 11 वाजताच्या सुमारास बैठक होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेते उपस्थित होते.
या बैठकीत लोकसभेसाठी 100 उमेदवारांच्या यादी तयार करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 चा आकडा पार करण्याचा निर्धार केला आहे. भाजपाने त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून, 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणा दिली आहे. भाजपाने यासाठी उमेदवारांची छाननी सुरु केली असून, 100 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर ही नावं निश्चित करण्यात आली आहेत.
केंद्रीय निवडणूक समितीसह नरेंद्र मोदींची ही बैठक पार पडली.येत्या दोन दिवसांत ही पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
भाजपाच्या या पहिल्या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश असू शकतो. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणसी, अमित शाह यांची गुजरातच्या गांधीनगर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची लखनऊतून उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते.
याशिवाय 2019 लोकसभा निवडणुकीत थोड्या फरकाने पराभूत झालेल्या मतदारसंघातील उमेदवारही जाहीर होऊ शकतात. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत भाजपा नेतृत्वाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, केरळ आणि तेलंगणा यांच्यावर जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जे राज्यसभेचे खासदार देखील आहेत ते एप्रिल-मे मध्ये होणारी आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या आमदारांमध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.