सातारा : या मतदारसंघातील मविआचे उमेदवार श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना पाटलांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी कोण दोन हात करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, साताऱ्यात नव्या उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झालेले असतानाच शरद पवार यांनी मात्र सातारच्या भूमित थाटात कॉलर उडवली आहे. कॉलर उडवून त्यांनी एका प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिलं आहे. पवारांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.
महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांना चांगलाच खटाटोप करावा लागला. ते काही दिवस दिल्लीत मुक्कामी होते. तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. उमेदवारी मिळत नसल्यामुळे ते मध्यंतरी शरद पवार यांच्या संपर्कात होते, असा दावा केला जात होता.
याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना उदयनराजे यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. आमचे काहीही बोलणे झालेले नाही, असे पवार यांनी सांगितले. पुढे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दोन्ही हातांनी थाटात कॉलर उडवली. पवारांनी कॉलर उडवताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. यावेळी शरद पवार यांनादेखील हसू आवरले नाही.
उदयनराजेंची स्टाईल महाराष्ट्रभर प्रसिद्ध
उदयनराजे भोसले हे त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे ओळखले जातात. ते भर सभेत, पत्रकार परिषदेत किंवा एखाद्या कार्यक्रमात थाटात कॉलर उडवतात. उदयनराजेंनी कॉलर उडवताच प्रेक्षकांतून टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतात. उदयनराजे हे नेहमीच बिनधास्त आणि स्टाईलने वावरत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात थाटात कॉलर उडविणारा नेता अशी उदयनराजे यांची ओळख आहे. मात्र याच उदयनराजेंच्या सातारा जिल्ह्यात जाऊन शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हातांनी कॉलर उडवली आहे. शरद पवारांच्या कॉलर उडवण्याच्या या कृतीची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. त्यामुळे सातारच्या मातीत प्रचारसभांचा धुरळा उडायचा अद्याप बाकी असताना त्याआधीच पवारांनी थेट कॉलर उडविल्यामुळे साताऱ्याची निवडणूक रंगतदार होणार, असे म्हटले जात आहे.