सुरगाणा पोलिस ठाण्यात नेमणुकीला असतानाही सतत गैरहजर राहिल्याने वेतन रोखण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात मद्याच्या नशेमध्ये धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. बी. गायकवाड (५४, रा. नाशिक) असे मद्यपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.गायकवाड हे नाशिक ग्रामीण पोलिस दलात पोलिस नाईक या पदावर कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांची नेमणूक सुरगाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते कर्तव्यावर गैरहजर आहेत. त्यातच त्यांना मद्याचेही व्यसन जडलेले आहे. त्यामुळे ते नियमित कर्तव्य बजावत नसल्याचे समोर आले होते.
यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयाने त्यांचे वेतन रोखत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मासिक वेतन न झाल्याने गायकवाड यांनी मद्यपान करून मंगळवारी (ता. २६) दुपारी आडगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले आणि ‘माझे वेतन का थांबवले’ याचा जाब विचारत धिंगाणा घातला.
यावेळी त्यांना तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु, मद्याच्या नशेमध्ये ते अर्वाच्यपणे बोलत होते. त्यामुळे ग्रामीण पोलिस मुख्यालयातील शिपाई संतोष सदगिर यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने, त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.