धक्कादायक घटना : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
धक्कादायक घटना : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
img
Dipali Ghadwaje
सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलीये. बीडच्या केज तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेबद्दल मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील औरंगपूर येथे ही धक्कादायक घटना घडलीये. ८ वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून दिनांक 5 एप्रिल रोजी विष प्राशन केले होते. विष प्राशन केल्याते समजताच तिला तातडीने अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान येथे उपचार सुरू असताना 12 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुंबेफळ येथील दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

विशेष म्हणजे हा छेडछाडीचा प्रकार पीडितेने कुटुंबीयांना सांगितला होता.  त्यानंतर कुटुंबीयांनी संबंधित मुलांच्या पालकांची भेट घेऊन त्यांची समजून घातली होती. परंतु त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिला. त्यामुळे पीडितेने या सर्वातून मुक्त होण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group