निवडणूक जसजशी जवळ येते, तसतसा प्रचारालाही वेग येतो. एरव्ही मतदारसंघामध्ये सहज म्हणूनदेखील फेरफटका न मारणारे उमेदवारही मतदारांच्या पायांवर आपले डोके टेकवताना दिसतात. अलीकडेच मथुरेच्या खासदार आणि लोकसभा उमेदवार हेमा मालिनी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हेमा मालिनी निवडणूक प्रचारादरम्यान महिला शेतकऱ्यांसोबत गव्हाची कापणी करताना दिसत आहेत.
अभिनेत्री हेमा मालिनी गुरुवारी म्हणजेच 11 एप्रिल रोजी बलदेव विधानसभेच्या गढी गोहनपूर गावात प्रचार करत होत्या. त्याचवेळी गव्हाच्या कापणीची वेळ असल्याने अनेक महिला शेतकरी त्यांच्या शेतात कापणी करत होते. हेमा मालिनी त्यांना भेटायला शेतात गेल्या. त्यांना त्यांची तब्येत विचारली. यानंतर मतदान करण्याचे आवाहन करून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली. हेमा मालिनी यांनीही गहू कापतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले, मेरो ब्रज लगे मोहे जग तै प्यारो….
महिलांशी संवाद
दरम्यान खासदार हेमा मालिनी गढी गोहनपूरच्या शेतात पोहोचल्या आणि तिथे गहू काढणाऱ्या महिलांशी चर्चा केली. हेमा मालिनी यांनी महिलांकडून केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महिलांना सांगितले की, केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे.
गव्हाच्या कापणीचे व्हिडिओ समोर
महिलांशी बोलल्यानंतर हेमा मालिनी यांनी त्यांच्याकडून विळा घेतला आणि त्यानंतर त्यांच्यासोबत गव्हाच्या पिकाची कापणी सुरू केली. हेमा मालिनी गव्हाचे पीक काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्या पिवळी साडी नेसून गव्हाच्या शेतात उभ्या आहेत आणि त्यांच्या हातात कापलेले गहू आणि विळा आहे. याशिवाय काही शेतकरी महिलाही शेजारी उभ्या आहेत.
अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा मतदारसंघातून त्या भाजपाच्या उमेदवार आहेत.२०१९ मध्ये, त्या २.९३ लाख मताधिक्याने निवडून आल्या होत्या. हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. खासदारकीच्या तिसऱ्या निवडणुकीत हेमा मालिनी यांच्यासमोर काँग्रेसच्या मुकेश धनगर यांचे आव्हान आहे.
हेमा मालिनी यांनी शेतात काम करत असल्याच्या व्हिडीओबाबत खुलासादेखील केला आहे. शेतकऱ्यांसोबत बोलण्यासाठी त्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या, तेव्हा त्या शेतकऱ्यांनीच त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह केला, असे त्या म्हणाल्या. मथुरेच्या खासदार झाल्यापासून गेल्या १० वर्षांमध्ये त्या सातत्याने अशा प्रकारे शेतकऱ्यांना भेटतात, असा दावाही त्यांनी केला आहे.