वर्धा : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. वर्ध्यात भाजपकडून रामदास तडस हे लोकसभेच्या रिंगणात उभे राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बुधवारी वर्ध्यातील पुलगावात रामदास तडस यांच्या प्रचारार्थ महायुतीने जाहीर सभेचं आयोजन केलंय.
या जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ' इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, ते हलतही नाही, चालतही नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
- ही निवडणूक ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि विधानसभेची निवडणूक नाही. ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे.
- आज देशात दोनच पर्याय आहे. एक पर्याय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वात महायुती आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आहे. त्यांच्या नेतृत्वात २६ पक्षाची खिचडी आहे.
- राहुल गांधींची खिचडी आहे, त्यात डब्बे नाही फक्त इंजिन आहे. त्यात राहुल गांधी, शरद पवार, ममता यांच्यासह सर्व म्हणतात, मी इंजिन आहे. मग इंजिनमध्ये बसायला जागा नाही.
- राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी. तर शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे यांना जागा तर उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा आहे. यांचं इंजिन हलत नाही आणि चालत नाही.
- दहा वर्षात मोदींनी 20 कोटी लोकांना काच्या घरातून पक्या घरात आणलं, यासंह विविध काम केली.
- 2026 नंतर महिलांना मोठा वाटा मिळणार. मोदी महिलांचं राज्य आणणार आहे.
- 4000 हजार कोटींची कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत मदत करू