"एकेकाळी मी शरद पवार यांना दैवत मानायचो"; मात्र आता....., नेमकं काय म्हणाले अजित पवार
img
Dipali Ghadwaje
पुणे : अजित पवार यांनी बंडखोरी करून महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबीयांमध्ये उभी फूट पडली होती. आता लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमने सामने आल्याने पवार कुटुंबामधील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाजूने एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. एकेकाळी मी शरद पवार यांना दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन झालं. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच कामगार दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.  

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लूट झाल्याचे आरोप केले. त्या आरोपांवर अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण देऊन दाखवावं महाराष्ट्रात कुठे लूट झाली. त्यांनी आणि मी सरकार अडीच वर्ष एकत्र चालवलं. आमच्यात कधीही मतभेद नव्हते. निवडणुकीच्या काळात असे आरोप होतात. निवडणुकीचं स्टेटमेंट गांभीर्याने घ्यायचं नसतं असं विलासराव यापूर्वी म्हटले होते.

 शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी टाळलं. अजित पवार म्हणाले की, मी एक वेगळा रस्ता स्वीकारला आहे. मी एकेकाळी त्यांना दैवत मानत होतो. त्यांच्या स्टेटमेंटबद्दल मी बोलावं इतका मोठा मी नाहीय.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला किती जागा मिळतील असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. अजित पवार यांनी या प्रश्नावर उत्तर देताना राज्यात भरपूर जागा येतील असं उत्तर दिलं.  

यावेळी पंतप्रधान मोदींवर होणाऱ्या टीकेवरही अजित पवार बोलले. ते म्हणाले की, मोदी साहेबांच्या विरोधात कुठलाही मुद्दा विरोधकांना राहिला नाही. खालचे मुद्देवर येतात. मोदी साहेबांवर भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही आरोप दहा वर्षात झाला नाही. त्याबद्दल हे कोणी काही बोलत नाही. मोदींमुळे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलं आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनता सुज्ञ आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group