वाशीम : जंगली प्राणी गाडीला आडवा आल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १९६ जवळ हा अपघात झाला. या घटनेत कार मधील एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर तत्परतेने बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं.
वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 196 जवळ हा अपघात घडला. समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत. दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे हा अपघात झाला.
वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल
या पूर्वीही या मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचा वाहनांची धडक लागून मृत्यू झाला आहे. यात हरणे, नीलगायी तसेच कुत्र्यांचा समावेश आहे. या प्राण्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवे आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.