आमच्यासोबत या. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील, अशी खुली ऑफरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांना दिली आहे. मोदी यांनी जाहीरसभेतून दिलेल्या या ऑफरवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
"ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विचार नाही. ज्यांची विचारधारा संसदीय लोकशाही मानत नाही. त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही", असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, मोदी यांच्यासोबतचे व्यक्तिगत संबंध चांगलेच राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींची ऑफर नाकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदूरबारमध्ये होते. त्यांनी जाहीरसभेतून तुम्हाला सोबत येण्याची ऑफर दिली आहे, असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त करत ते पुन्हा महाराष्ट्रात आले? सहाव्यांदा की सातव्यांदा आले? असा आश्चर्यचकीत सवाल शरद पवार यांनी विचारला. त्यानंतर पवार यांनी मोदींची ऑफर नाकारत असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान माझी काही व्यक्तिगत मते आहेत. त्यांच्याशी संबंध हा वेगळा भाग आहे. धोरणातील संबंधातील मतं वेगळं आहे. या देशात संसदीय लोकशाही पद्धती मोदींमुळे संकटात आलीय. हे माझं मत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक करून तुरुंगात टाकलं.
यामागे केंद्रीय नेतृत्वाचा, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नाही. ज्या व्यक्तीचा, पक्षाचा आणि त्यांच्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. मग ते सत्ताधारी असतील किंवा इतर… अशा लोकांसोबत असोसिएशन होणार नाही… व्यक्तीगत संबंधाचं जोडा … पण राजकीय संबंध प्रस्थापित करणं हे माझ्याच्यानं कधी होणार नाही, असं शरद पवार म्हणाले.