नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास नाशिक शहरातील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी लावून सुमारे पाऊणे दोन किलो सोन्यासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. प्रथमच जिल्ह्याबाहेर शहर पोलिसांनी जाऊन मोठा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रकार घडला. तपास केलेल्या हवालदार शिंदे यांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीत दरोडा व चोरीचा गुन्हा घडून सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल गेला होता. यात सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. चाळीसगाव व जळगाव पोलिसांकडून या गुन्ह्यांची उकल होत नव्हती, म्हणून चाळीसगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी नाशिक शहर गुन्हे पोलीस उपायुक्त यांना पत्र देऊन पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना तपासाकामी पाठवण्या बाबत विनंती केली होती. नाशिक शहर पोलिसात दाखल होण्यापूर्वी पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यात अनेक चोरी, दरोड्यांच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास केल्याचे पाहता त्यांना जिल्हा बाहेर तपासकामी निवडले गेले.
युनिट २ मध्ये कार्यरत असलेल्या हवालदार मनोहर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्या काळच्या खबरी व रेकॉर्ड वरचे गुन्हेगार तपासले. ज्या पद्धतीने मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा घडला त्याची प्रथमिक माहिती घेऊन व गुन्हा झाल्याच्या पद्धतीचे निरीक्षण करून अशा पद्धतीचे गुन्हे करणारे आरोपी हे मध्यप्रदेश मधील नंदिया, धैली, सातपुडा येथील असल्याचे निरीक्षण केले.
जळगाव पोलिसांमधील अधिकारी, कर्मचारी यांची मदत घेऊन पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी मध्यप्रदेश गाठून डोंगर दर्या पार करून जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी तपास करून गुन्हा करणार्या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून सुमारे १८२ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा सुमारे १६ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या आरोपींकडून जळगाव जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता आहे.
शहर पोलिसांनी जिल्ह्याबाहेर जाऊन यशस्वी तपास केल्या बद्दल पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी अभिनंदन केले.