नाशिक पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले! पंचवटीत १७ वर्षीय युवकाचा खून
नाशिक पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले! पंचवटीत १७ वर्षीय युवकाचा खून
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक शहरातील खुनांची मालिका चालूच असून, काल (दि. 30) पंचवटी येथील कर्णनगर भागात किरकोळ वादातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा तीक्ष्ण हत्याराने गंभीर वार करून खून करण्यात आला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली.


पंचवटी पोलिसांनी रात्री तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, हे तिघेही संशयित विधिसंघर्षित असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

याबाबत पंचवटी पोलिसांनी मिळालेली माहिती अशी, की आशिष दशरथ रणमाळे (वय 17, रा. कर्णनगर, पेठ रोड, पंचवटी) हा रात्री घराजवळील कर्णनगर सार्वजनिक वाचनालय येथे बसलेला असताना तिघा संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून तीक्ष्ण हत्याराने हातावर, छातीवर, पाठीवर, तसेच डोक्यावर गंभीर वार करून त्याला जबर जखमी केले. ही घटना त्याच्या कुटुंबीयांना समजताच आरडाओरडा करून त्यांनी मदतीला बोलावले. यावेळी हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर जखमी युवकाच्या वडिलांनी परिसरातील एका रिक्षाचालकाच्या मदतीने आशिषला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. शरदचंद्र मार्केट यार्डाच्या मागे असलेल्या कर्णनगर भागातील खंडेराव मंदिर व वाचनालय येथील या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मयत आशिष हा रात्री घराजवळील अंगणवाडीच्या पायऱ्यांवर बसलेला असताना त्याच्या ओळखीच्या काही मुलांनी तेथे येऊन कोणतीही विचारणा न करता आशिषवर तीक्ष्ण हत्याराने सपासप 16 वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने आशिषला काहीही हालचाल करता आली नाही. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा आवाज ऐकून त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली व शेजाऱ्यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र तो त्याआधीच मयत झाला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी आशिषच्या कुटुंबीयांची समजूत काढली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीच्या आधारे काही वेळातच तिघा संशयितांना ताब्यात घेतले. हे तिघेही विधिसंघर्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर मयत आशिषचे वडील दशरथ बाबूराव रणमाळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर हे पुढील तपास करीत आहेत.
 
आशिष दशरथ रणमाळे (वय 17) हा बारावीत शिकत होता. तो घरात एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार असून, वडील मार्केटमध्ये हमालीचे काम करतात. त्याच्या घटनेमुळे रणमाळे कुटुंबीयांवर आघात झाला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group