नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- स्क्रॅप मटेरियल वेळोवेळी विश्वासाने घेऊन त्याच्या वजनाच्या खोट्या पावत्या तयार करून एका कंपनीमालकाची सुमारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वे ब्रिजचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रशांत अरुण संगई (वय 65, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, की गेल्या 20 वर्षांपासून आरोपी अंबड एमआयडीसीमधील महाराष्ट्र वे ब्रिज, जानकी वे ब्रिज एक्स्लो पॉईंट, इंडस्ट्रियल वे ब्रिज या फर्मच्या मालक व चालकांनी फिर्यादी यांच्या मालकीच्या अंबड एम. आय. डी. सी. मधील प्लॉट नंबर जे-48 व बी-81 या प्लॉटवरील इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन इंडिया प्रा. लि., तसेच प्लॉट नंबर 6 वर असलेल्या ऊरजयंत इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीमधील स्क्रॅप मटेरियल वेळोवेळी खरेदी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे; मात्र आरोपी अभिषेक शर्मा य इतर चालकांनी संगनमत करून स्क्रॅप मटेरियलचे वजन करून त्याच्या खोट्या वजनपावत्या तयार करून गेल्या 20 वर्षांपासून करोडो रुपयांची फसवणूक केली.
ही बाब लक्षात आल्यानंतर कंपनीमालक संगई यांनी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.