नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गुंतवणूकदारांना मोठमोठी प्रलोभने देऊन कमी रकमेत फ्लॅट देतो असे आमिष दाखवून सुमारे 3 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक करून फरार झाल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी कुणाल प्रकाश घायाळ (रा. पाईपलाईन रोड, गंगापूररोड) व इतर संबंधित यांनी दि. 19 ऑगस्ट 2013 ते सन 2021 या कालावधीत मौर्या होईट्स या नावाने ध्रुवनगर, शिवाजीनगर येथे इमारतीच्या बांधकामाची साईट सुरु केली होती. आरोपींनी फिर्यादी अमोल भरत भागवत (वय 29, रा. उत्तमनगर, सिडको) यांना या इमारतीचे दस्तऐवज विविध गुंतवणुकदारांना संबंधित विभागात लिहून दिले. तसेच के.के. डेव्हलपर्स व अंश प्रॉपर्टीज्, विसे मळा, कॉलेजरोड येथे स्वत:चे मोठे ऑफिस असल्याचा देखावा निर्माण करुन त्याचप्रमाणे फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांना मोठमोठी आश्वासने देऊन कमी रकमेत फ्लॅट देतो असे आमिष दाखवून मौर्या हाईट्स या इमारतीबाबत जाहिरात पत्रक तयार केले.
त्यामध्ये वन बिएचके फर्निश फ्लॅट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जी.एस.टी., लिगल फी सर्व खर्चासहीत फ्री अलॉटेड पार्किंग, फ्री मॉड्युलर किचन ट्रॉली, एलईडी टी.व्ही., फ्रिझ इत्यादी सुविधांसह उत्तम दर्जेदार बांधकाम, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतग्रत 2 लाख 67 हजार रुपयांची सबसीडी आणि रेरा ॲप्रुव्हर्ड अशी जाहिरात देऊन फिर्यादी भागवत यांच्याकडून 11 लाख 70 हजार रुपये स्वीकारले. तसेच इतर गुंतवणूकदार यांच्याकडूनही वेगवेगळ्या प्रकारे अंदाजे 3 कोटी 26 लाख रुपयांच्या रकमा स्वीकारल्या.
त्याबदल्यात बिल्डर कुणाल घायाळ याने मौर्या हाईट्स या इमारतीमधील 24 फ्लॅटच्या गुंतवणूकदारांना करारनामा, साठेखत, नोटरी, जनरल मुखत्यारपत्र असे वेगवेगळे दस्तऐवज लिहून व नोंदवून दिले होते. तसेच त्यांच्याकडून फ्लॅटच्या मोबदल्यापोटी ठेवी रकमा स्वीकारुन इमारतीचे बांधकाम अपूर्ण ठेवले. तसेच मुदतीत गुंतवणूकदारांना फ्लॅटचा ताबा न देता त्यांच्याकडून स्वीकारलेल्या ठेवींच्या रकमेची अफरातफर केली.
तसेच फिर्यादीकडून व इतर गुंतवणूकदारांकडून रक्कम परत न करता आरोपी कुणाल घायाळ हा फरार झाला असून, त्याने सुमारे 3 कोटी 26 लाख रुपयांचा परतावा न देता आर्थिक फसवणूक केली म्हणून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण करीत आहे.