महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
महायुती सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या घोषणा केल्या आहेत. माजी अर्थमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पातून सरकारवर टीका केली आहे. पराभवाच्या भीतीने या सरकार भरमसाठ घोषणा केल्या आहेत, असे पाटील म्हणाले.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, "आपल्या महाराष्ट्राचे बजेट आज मांडण्यात आले. देशातील लोकसभा निवडणुकीचा फटका इतका मोठा आहे की, एक म्हण आहे 'जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने.' आता चादर फाटली असल्याने सत्ताधाऱ्यांनी खैरात वाटायला सुरूवात केली आहे. यांना आता खात्री झाली आहे की, आपला पराभव निश्चित आहे. त्यामुळे हा शेवटचा प्रयत्न सरकारने केला आहे."
"सरकारने केलेला हा प्रयत्न फक्त तीन महिन्यांसाठी आहे. कारण तीन महिन्यांनी आचारसंहिता लागेल. त्यामुळे त्यांना माहिती आहे की, पुढचे तीन महिने पैसे वाटप करायचे आहेत बाकीचं नंतरचे आल्यावर बघतील. त्यामुळे हे एक बेजबाबदारपणे मांडलेले बजेट आहे.
हा एक आकडेवारीचा खेळ आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेलचा दर कमी करण्याचा फक्त आव आणला आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने देखील हेच केले होते," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर आपले मत व्यक्त केले.