नाशिक (प्रतिनिधी) :- जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत विद्यमान आमदार व खासदार यांना पळसे गावात बंदी असल्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे, की मराठा मतदार, मराठा अस्मिता यावर निवडून आलेले विद्यमान खासदार व विद्यमान आमदार यांनी आजवर कधीही मराठा आरक्षण या विषयावर तोंड उघडले नाही. लोकसभा व विधानसभेच्या सभागृहात एकदाही प्रश्न उपस्थित केल्याचे ऐकिवात नाही. आपण सर्व मराठा बांधव त्यांना जाब विचारूया. आपण सर्व बांधव मतदान करताना जातीच्या व पक्षाच्या मुद्यावर एक होतो; मात्र जातीची माती करणाऱ्या व मराठा मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी मतदान मागताना यानंतर हजारदा विचार करावा.
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमदार व खासदारांनी गावात फिरकू नये; अन्यथा गंभीरपणे परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा सकल मराठा समाज, पळदसे गाव यांच्या वतीने यातून देण्यात आला आहे.
हेही वाचा : ड्रगमाफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक
आज दुपारी साडेचार वाजता केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंद्र या केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनासाठी आ. सरोज अहिरे व खा. हेमंत गोडसे हे पळसे गावात येतात का, यावर आता लक्ष लागून आहे.