नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सागर सुधाकर पगारे (रा. फुलेनगर, पंचवटी) यांचा दिंडोरी रोडवरील मार्केट यार्डात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे.
आरोपी सागर जाधव (रा. राहुलवाडीसमोर, फुलेनगर) व त्याचा एक मित्र या दोघांनी मिळून फिर्यादी पगारे यांच्याकडे शिवजयंती साजरी करण्याकरिता वर्गणीव्यतिरिक्त डेकोरेशनसाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यामुळे घाबरलेल्या पगारे यांनी या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात फक्त शिवीगाळ व दमदाटीबाबत तक्रार केली होती. तो राग मनात धरून आरोपी सागर जाधव व त्याच्या मित्राने फिर्यादीच्या घराबाहेर येऊन तक्रार मागे घेण्याची मागणी केली, तसेच तक्रार मागे घेतली नाही, तर जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच तोंडाला रुमाल बांधलेल्या आरोपीने भाईविरुद्ध तक्रार देतो का, तक्रार मागे घे, नाही तर तुला मार्केटला आल्यावर ठार मारतो, अशी धमकी दिली.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.