पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची विद्यापीठाने गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलांची आणि मुलींची स्वतंत्र वसतिगृहे आहेत. त्यातील मुलांच्या वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीने लिहिले आहे. हा प्रकार गुरुवारी निदर्शनास आला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर हॉस्टेलमध्ये ही खळबळजनक घटना घडलीये.
दरम्यान संबधित आक्षेपार्ह मजकूर कुणी लिहिला याचा शोध विद्यापीठाकडून घेतला जातोय. विद्यापीठातच पंतप्रधान मोदी यांच्याविषयी मजकूर लिहिल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडालीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठ परिसरात आंदोलन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
२ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ कॅम्पसमधील मुलांचे वसतीगृह क्र .८ येथील कपडे धुण्याच्या ठिकाणी अक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. भिंतीवर काळ्या रंगाच्या पेंटने इंग्रजी अक्षरामध्ये लिहिलं होतं. इतरांना त्रास होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अश्लील लिखाण करण्याचे कृत्य करुन पुणे विद्यापिठाची बदनामी केली म्हणून अनोळखी इसमाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असे लिहिणे गैर आहे. शिवाय विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ज्ञान मिळते अशा ठिकाणी ही घटना घडाली आहे. यामुळे शिक्षकांसह, विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये देखील खळबळ पसरलीये.