गेली ३५ वर्षांपासून इंदूर लोकसभेची जागा जिंकण्याची प्रतीक्षा करत असलेले काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाला मोठा धक्का दिला. एवढेच नव्हे, तर लगेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला. सूरत, खजुराहोनंतर आता या तिसऱ्या जागी भाजप उमेदवाराचा विजय निश्चितमानला जात आहे.
बम यांनी सोमवारी स्थानिक भाजप आमदार रमेश मेंदोला यांच्यासह जिल्हा दंडाधिकारी कार्यालय गाठले आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेथून मेंदोला यांच्यासोबत कारने निघून गेले. थोड्या वेळाने मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप कार्यालय गाठले व प्रवेशाची घोषणा केली. सूरत, खजुराहोनंतर इंदूरची जागा भाजपच्या झोळीत आली आहे.
विजयवर्गीय यांना कुणी दिला कानमंत्र?
इंदूरमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसणार आहे. आता भाजपची येथे अपक्ष उमेदवारांशी स्पर्धा आहे. काँग्रेस कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देते हे पाहणे बाकी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ज्याप्रकारे भाजप नेत्यांना कानमंत्र दिला, त्यावरून विजयवर्गीय यांनी ही पटकथा तयार केल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आता १४ उमेदवार उरले रिंगणात
काँग्रेसच्या उमेदवारासह ९ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतल्यानंतर इंदूरमध्ये भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार लढतीत नाही. कधीकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच नसल्याचे चित्र आहे.