पैश्यांच्या वादातून ठेकेदाराने केला मजुराचा खून
पैश्यांच्या वादातून ठेकेदाराने केला मजुराचा खून
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पैसे देण्याघेण्यावरून झालेल्या वादातून ठेकेदाराने मजुराच्या डोक्यात बल्ली मारून त्याचा खून केल्याची घटना आडगाव-म्हसरूळ मेरी लिंक रोडवर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, की आरोपी ठेकेदार तय्यब महंमद बाबूजान शेख (रा. पवारवाडी, जेलरोड, नाशिकरोड, मूळ रा. बिहार) व मयत गौतम सखाराम काळे हे एकाच ठिकाणी राहतात. गौतम काळे हा मजुरी करायचा. मयत गौतम काळेच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे, की दोन दिवसांपूर्वी मजुरीचे पैसे घेण्यावरून गौतम काळे व तय्यब महंमद बाबूजान शेख यांच्यात फोनवर वादावादी झाली होती. दि. 25 मे रोजी शेखने गौतम काळेला आडगाव-म्हसरूळ मेरी लिंक रोडवर असलेल्या बांधकामाच्या साईटवर सकाळी बोलावून घेतले होते.

त्यावेळी पुन्हा त्यांच्यात मजुरीच्या पैशांवरून वाद होऊन शेखने मजुराला शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी बल्ली त्याच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

शीला गौतम काळे यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तय्यब शेखला काल रात्री अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group