मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरून सुरु झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, जालन्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर मी स्वत: मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचित केली आहे.
मराठा समाजाची आंदोलने आपण सर्वांना पाहिली आहेत. लाखोंचे ५८ मोर्चे शांततेत राज्यात निघाले. मात्र दोन-तीन दिवसांपासून जे काही घडतंय त्याबद्दल मी बोललो आहे. आंदोलनाच्या आडून महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचं काम सुरु आहे, याबाबत मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, अतूल सावे मंत्री, खासदार उदयनराजे भोसले देखील बैठकीला उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र ते टिकलं पाहिजे. आम्हाला कोणाला फसवायचं नाही. आमची भुमिका देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही होती आणि आजही आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या मुद्द्यावर काम आता सुरु आहे. आयोगाला सूचना केल्या आहेत. ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने काढल्या आहेत त्यावर काम सुरु आहे. मराठा समाजाला माझी विनंती आहे, सरकार पूर्णपणे प्रमाणिकपणे आरक्षण देण्याच्या बाजूने आहे.